सिरोंचा :
सामुदायिक वनहक्क (CFR) क्षेत्रातील ग्रामसभेच्या कामकाजात वनविभागाने हस्तक्षेप करू नये, तसेच ग्रामसभेच्या अधिकारांवर अतिक्रमण होईल अशा प्रकारे कोणताही दबाव अथवा जबरदस्ती करू नये, अशी ठाम भूमिका येडचिली ग्रामसभेने घेतली आहे. याबाबत ग्रामसभेच्या वतीने सिरोंचा तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.हे निवेदन नायब तहसीलदार हलामी साहेब यांनी स्वीकारले.ग्रामसभेने दिलेल्या निवेदनात सामुदायिक वनहक्क (CFR) क्षेत्रातील मंजूर शासकीय रोपवनाचे काम ग्रामसभेच्या माध्यमातून व स्थानिक ग्रामस्थांच्या सहभागाने करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. रोपवनासाठी कोणती प्रजाती निवडायची, कोणत्या ठिकाणी लागवड करायची, तसेच संरक्षण व देखभाल कशी करायची, याबाबत ग्रामसभा आणि सामुदायिक वनहक्क समितीचा सहभाग असणे आवश्यक असल्याचे ग्रामसभेने स्पष्ट केले आहे.वनहक्क कायदा 2006 आणि संबंधित वनहक्क नियमांनुसार CFR क्षेत्राच्या संरक्षण, संवर्धन आणि व्यवस्थापनामध्ये ग्रामसभेची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामसभेच्या निर्णय प्रक्रियेला डावलून वनविभागाने एकतर्फी पद्धतीने कोणतीही कार्यवाही करू नये, अशी मागणी करण्यात आली आहे.वनविभागाला ग्रामसभेच्या कामकाजात हस्तक्षेप न करता ग्रामसभेशी समन्वय साधून काम करण्याची मागणी करण्यात आली आहे. एखाद्या कामाबाबत वनविभागाला आक्षेप किंवा वेगळे नियोजन असल्यास ते ग्रामसभेसमोर मांडून कायदेशीर प्रक्रियेनुसार निर्णय घेण्यात यावा, अशी भूमिकाही ग्रामसभेने मांडली.दरम्यान, ग्रामसभेच्या या भूमिकेला ग्रामस्थांनीही पाठिंबा दर्शविला असून निवेदनासोबत अनेक ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या व अंगठ्यांचे ठसे असल्याचे दिसून येते.निवेदन देताना पदाधिकारी उपस्थित,निवेदन सादर करताना सिरोंचाचे माजी उपसरपंच व सामाजिक कार्यकर्ते रवि सल्लम, माजी सरपंच कारे मडावी, तसेच येडचिली ग्रामसभेचे पदाधिकारी व सदस्यगण उपस्थित होते.ग्रामसभेच्या अधिकारांचे संरक्षण करून CFR क्षेत्रातील कामांमध्ये ग्रामसभेचा निर्णय आणि स्थानिक ग्रामस्थांचा सहभाग कायम ठेवावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.आता या निवेदनावर जिल्हाधिकारी व संबंधित वनविभागाकडून काय भूमिका घेतली जाते, याकडे येडचिली ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे..


