ए बी के न्यूज लाईव्ह
के गणेश /पारशिवनी
कन्हान : भारताचे माजी राष्ट्रपती, महान तत्त्वज्ञ व शिक्षणतज्ज्ञ भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त ५ सप्टेंबर रोजी कन्हान शहर व परिसरातील विविध शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी डॉ. राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी शिक्षकांची वेशभूषा करून सहभाग घेतला, तर शिक्षकांचा सत्कार करून त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.*हिराबाई उच्च प्राथमिक शाळेत शिक्षक दिन उत्साहात*हिराबाई उच्च प्राथमिक शाळा, कन्हान येथे शिक्षक दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नरेंद्र वाघमारे, तर प्रमुख पाहुण्या वंदना रामापुरे, हिराबाई वस्तीगृहाचे अध्यक्ष गणेश रामापुरे प्रामुख्याने उपस्थित होते. शाळेचे संचालक नरेंद्र वाघमारे यांच्या हस्ते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या वेशभूषेत उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. अध्यक्षीय भाषणातून नरेंद्रजी वाघमारे यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व सांगत उज्ज्वल भविष्यासाठी मोलाचे मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनीही शिक्षक दिनानिमित्त आपली मनोगते व भाषणे सादर केली.कार्यक्रमाची प्रास्ताविका मुख्याध्यापक हेमंत वंजारी यांनी केली, तर आभार प्रदर्शन पवन ढमके यांनी केले. कार्यक्रमात जयश्री पवार, गीता हरी वंजारी, सुवर्णा रामापुरे, कीर्ती वैरागडे, नेहा गायधने, योगिता चांदेवार, अभिषेक मोहनकर, भास्कर सातपुते, प्रतीक्षा निंबोणे, रुपेंद्र सेंगर, हेमंत वाघमारे यांच्यासह शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.*पिपरी जिल्हा परिषद शाळेत शिक्षक दिनासोबत सेवापूर्ती सोहळा*जिल्हा परिषद उच्च व प्राथमिक शाळा, पिपरी येथे शिक्षक दिन तसेच सेवापूर्ती सोहळा उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कन्हान-पिपरी नगरपरिषदेच्या नगरसेविका सौ. प्रियंका ठाकूर, तर प्रमुख पाहुणे म्हणून शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य श्री. प्रशांत बाजीराव मसार प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरवात सौ. प्रियंका ठाकूर यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून करण्यात आली. विद्यार्थ्यांनी शिक्षकांची वेशभूषा करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी नगरसेविका प्रियंका ठाकूर व शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य प्रशांत बाजीराव मसार यांनी अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणाऱ्या शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आणि विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. सेवापूर्ती सोहळ्या निमित्त सौ. सरिता चोबीतकर यांचा शाल, श्रीफळ, वृक्ष व पुष्पगुच्छ देऊन सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. आपल्या ३२ वर्षांच्या सेवाकाळातील शैक्षणिक अनुभव व्यक्त करत त्यांनी विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना पेन, पेन्सिल, रबर आदी शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. विद्यार्थ्यांना मिठाईचेही वाटप करण्यात आले.
सेवापूर्ती सोहळ्याचे औचित्य साधून शालेय परिसरात वटवृक्षाचे रोपण करून वृक्षारोपणाचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमाची प्रास्ताविका मुख्याध्यापिका सौ. सारिका राऊत यांनी केली, तर आभार प्रदर्शन शिक्षक गेंदलाल बावनकुळे यांनी केले. यावेळी पारशिवनी शाळा केंद्रप्रमुख बंसोड, शिक्षक सुभाष चोबीतकर, शालेय पोषण आहार मदतनीस, शिक्षक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.अंगणवाडी क्रमांक १२६ मध्ये शिक्षक दिन साजरा*कन्हान – पिपरी येथील ढिवरपुरा परिसरातील अंगणवाडी क्रमांक १२६ येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. अंगणवाडी सेविका सुनीता मानकर यांच्या पुढाकाराने आयोजित कार्यक्रमाची सुरुवात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी सुनीता मानकर यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनकार्याची माहिती देत शिक्षक दिनाचे महत्त्व उपस्थितांना समजावून सांगितले. बालकांच्या जडणघडणीत शिक्षक व अंगणवाडी सेविकांची भूमिका महत्त्वपूर्ण असून, संस्कार, शिक्षण आणि ज्ञानाची पहिली पायरी बालपणापासूनच सुरू होते, असे त्यांनी सांगितले.कार्यक्रमादरम्यान शैक्षणिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली तसेच शिक्षकांचा सत्कार करून त्यांना सन्मानित करण्यात आले. बालकांना शिक्षणाची गोडी लागावी आणि त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळावी, यासाठी विविध उपक्रम घेण्यात आले.कन्हान शहर व परिसरात विविध शैक्षणिक संस्थांमध्ये झालेल्या या कार्यक्रमांमुळे शिक्षक दिनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. शिक्षकांच्या कार्याचा गौरव, विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि ज्ञान-वृक्ष जोपासण्याचा संदेश यामुळे संपूर्ण परिसरात शैक्षणिक वातावरण निर्माण झाले.


