नागभीड :
- नागभीड शहरातील बिक्केवार चौक येथे नगरपरिषदेच्या माध्यमातून अवघ्या महिनाभरापूर्वी उभारण्यात आलेला सोलर प्रकल्प अचानक कोसळल्याची घटना घडली. सोलर पॅनल, पाण्याची टाकी आणि लोखंडी स्ट्रक्चर खाली कोसळले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, नागरिकांची वर्दळ असलेल्या ठिकाणी ही घटना घडल्याने मोठी दुर्घटना टळल्याची चर्चा आहे.
अवघ्या महिनाभरातच प्रकल्प कोसळल्याने या कामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. वापरण्यात आलेले साहित्य, स्ट्रक्चरची मजबुती, तांत्रिक तपासणी, कामाची गुणवत्ता तसेच संबंधित कंत्राटदार आणि नगरपरिषद प्रशासनाच्या देखरेखीबाबत चौकशी करण्याची मागणी पुढे आली आहे.या प्रकरणाची निष्पक्ष व तांत्रिक चौकशी करून दोषी आढळणाऱ्या संबंधित कंत्राटदार, अधिकारी किंवा इतर जबाबदार व्यक्तींवर नियमानुसार कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भाजप गटनेते गणेश तर्वेकर तसेच नगरसेवक अवेश पठाण, सचिन आकुलवार, हेमंत नन्नावरे, शिल्पा शेंडे आणि प्रिया लांबट यांनी केली आहे.सोलर प्रकल्पाच्या कामासंदर्भातील अंदाजपत्रक, निविदा प्रक्रिया, वर्क ऑर्डर, करारपत्र, वापरलेल्या साहित्याचा दर्जा, मोजमाप पुस्तिका (MB), तांत्रिक व गुणवत्ता तपासणी अहवाल, पूर्णत्व प्रमाणपत्र आणि संबंधित देयकांची तपासणी करण्यात यावी, अशी मागणी नगरसेवकांनी केली आहे. तपासणीत अनियमितता किंवा निष्काळजीपणा आढळल्यास संबंधितांवर कायद्यानुसार योग्य ती कारवाई करावी, असेही त्यांनी म्हटले आहे.नगरसेवकांनी नागभीड शहरातील नगरपरिषदेच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या इतर सोलर प्रकल्पांचीही तातडीने तांत्रिक व सुरक्षितता तपासणी करण्याची मागणी केली आहे. भविष्यात अशा प्रकारची घटना घडून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
“अवघ्या एका महिन्यात सोलर प्रकल्प कोसळणे ही गंभीर बाब आहे. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. या घटनेची तातडीने चौकशी करून कामाच्या गुणवत्तेबाबत व जबाबदारीबाबत स्पष्टता करण्यात यावी,” अशी भूमिका गणेश तर्वेकर व संबंधित नगरसेवकांनी मांडली.


