सेलू/अभय बेदमोहता
स्थानिक मेडिकल चौकातील एका एटीएम केंद्रावर नागरिकांची नजर चुकवून एटीएम कार्डची अदलाबदल करत गंडा घालणाऱ्या परराज्यातील सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात सेलू पोलिसांना मोठे यश आले आहे. जरी या गुन्ह्याच्या तपासातील सुरुवातीच्या प्रक्रियेत सचिन वाटखेडे व अखिलेश गव्हाने यांना हटविण्यात आले असले, तरी या प्रकरणातील मूळ आरोपींचा शोध घेत त्यांना जेरबंद करण्यात या पोलिसांचा हातखंडा कौशल्य आणि तपासाची धडाकेबाज हातोटी पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे!
दिनांक १३/०७/२०२६ रोजी तक्रारदार लिलाधर वसंतराव नागपुरकर (वय ४३, रा. सुकळी स्टे., ता. सेलू) हे मेडिकल चौकातील एस.बी.आय. बँकेच्या एटीएममधून पैसे काढत असताना ही घटना घडली.
दोन अज्ञात आरोपींनी त्यांच्या मागे उभे राहून एटीएमचा पिन पाहिला व फिर्यादी बाहेर जात असताना त्यांना परत बोलावून कार्ड मशिनमध्ये टाकावयास सांगून बोलण्यात व्यंग व व्यस्त ठेवले.
त्यातील एकाने नजर चुकवून एटीएम कार्डची चलाखीने अदलाबदल केली आणि बाहेर उभ्या असलेल्या कारमधून दोघेही पसार झाले.
न
नागपुरात यांनी घरी जाऊन फोन-पे तपासले असता खात्यात कमी शिल्लक असल्याचे दिसून आले. बँकेत जाऊन स्टेटमेंट काढले असता, घोराड येथील दुसऱ्या एटीएममधून आरोपींनी १६,०००/- रुपये काढून फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले.
पो.स्टे. सेलू येथे अप क्रमांक ५२६/२०२६ अन्वये कलम ३१८(४), ३(५) बी.एन.एस. नुसार गुन्हा नोंदवून तात्काळ तपास सुरू करण्यात आला. पोलिसांना तपासात आरोपींकडे भलत्याच व्यक्तीचे एटीएम कार्ड आढळले आणि एटीएम मशिनमधील फोटो व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे खबऱ्यांना अलर्ट करण्यात आले.
वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनात पोलीस स्टेशन सेलू येथील ठाणेदार व अंमलदार यांनी अज्ञात आरोपीच्या शोधाकरिता पथक नेमून मागवर असताना, दिनांक २३/०८/२०२६ रोजी गुप्त बातमी मिळाली की सीसीटीव्हीमध्ये दिसणाऱ्या वर्णनाचा एक व्यक्ती हुडकेश्वर नाका परिसर, नागपूर येथे पांढऱ्या रंगाच्या कारने फिरत आहे. मिळालेल्या माहितीवरून सेलू पोलीस स्टेशनचे पथक नागपूर येथे रवाना होऊन आरोपी अजहरुद्दीन ताहीर हुसैन (वय ३६ रा. टोंका ता. हाथिन जि. पलवल राज्य हरियाणा) यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून वेगवेगळे बँकेचे एटीएम कार्ड, गुन्हा करताना वापरलेली एक पांढऱ्या रंगाची कार, मोबाईल व फसवणूक करून घेतलेली नगदी रक्कम असा एकूण ५,१७,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपीस अटक करण्यात आली असून पोलीस दुसऱ्या आरोपीच्या मागावर आहेत.
सदरची यशस्वी कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल (आय.पी.एस.), अपर पोलीस अधीक्षक श्री. सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुनील महाडीक यांचे मार्गदर्शनात पोलीस स्टेशन सेलूचे कर्तव्यदक्ष ठाणेदार पंकज वाघोडे व अंमलदार मनोहर मुडे, अखिलेश गव्हाणे, सचिन वाटखेडे, विनायक गोडे व ओमप्रकाश तल्लारी यांनी केली असून पोलिसांच्या या तत्पर कारवाईमुळे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.


