सेलु/अभय बेदमोहता
ग्रामविकासाचा गाडा हाकण्यासाठी महत्त्वाची मानली जाणारी ‘ग्रामसभा’ म्हणजे जणू काही खेळखंडोबा बनल्याचा संतापजनक प्रकार जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील ‘हेलोडी’ ग्रामपंचायतीमध्ये समोर आला आहे. नोटीस बोर्डवरील विषयांना फाट्यावर मारत, ग्रामस्थांना कोणतीही पूर्वकल्पना न देता थेट आरोग्य विभागाला हाताशी धरून वेगळाच विषय लादण्यात आला. यातच ग्रामसेवक कार्यालयात हजर असूनही ग्रामसभेत संपाचे नाटक रचत सरपंच-ग्रामसेवकांनी ग्रामस्थांच्या डोळ्यात धूळफेक केली आहेहेलोडी ग्रामपंचायतीमध्ये पारदर्शक कारभाराचा पूर्णपणे बोजवारा उडाला असून सरपंच आणि ग्रामसेवकांच्या मनमानी कारभाराविरोधात ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप उसळला आहे. नुकत्याच आज २४ ऑगष्ट रोजी पार पडलेल्या ग्रामसभेत नियोजित विषयांवर चर्चा करणे अपेक्षित असताना, सरपंचांनी मनमानी करत गोंधळ घातला.ग्रामसभेच्या अधिकृत नोटीसवर जे विषय नमूद होते, त्या विषयांवर चर्चा होणे गरजेचे होते. परंतु, ऐनवेळी सेलूच्या आरोग्य विभागाने येऊन एड्स विषयावर माहिती दिली, जी आधीच्या कोणत्याही नोटीस बोर्डवर नव्हती. त्यामुळे मूळ विषय बाजूला पडून ग्रामसभा अक्षरशः भरकटली. विशेष म्हणजे, पुढील ग्रामसभा कधी होणार याबाबत कोणतीही अधिकृत माहिती ग्रामस्थांना देण्यात आली नाही.
Ya महत्त्वाच्या ग्रामसभेबाबत मोठा भोंगळ कारभार समोर आला आहे. गावात कोणतीही नोटीस लावली नाही, तसेच ग्रामपंचायतीच्या ग्रुपवरसुद्धा कोणतीही माहिती शेअर केली नाही. एवढेच नव्हे तर, ग्रामपंचायतीचे सदस्य, पोलीस पाटील, तलाठी आणि कोतवाल यांसारख्या जबाबदार घटकांना ग्रामसभेची कोणतीही नोटीस किंवा निमंत्रण दिले गेले नसल्याचे समोर आले आहे.
केवळ ४० ग्रामस्थांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या ग्रामसभेमध्ये साधा हिशोब मागितला असता सरपंच उडवाउडवीची उत्तरे देत टाळाटाळ करू लागले. ग्रामसेवक कार्यालयात असतानाही संपाची खोटी बतावणी करणे आणि प्रशासकीय यंत्रणेला अंधारात ठेवणे, यामुळे सरपंच आणि ग्रामसेवकांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याप्रकरणी वरिष्ठांनी लक्ष घालून तात्काळ कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.


