वर्धा/ अभय बेदमोहता
जिल्हा अंतर्गत येणाऱ्या खरांगना परिसरातील मासोद येथील जिवनराव यांचे शेतात तब्बल १३ फूट लांबीचा महाकाय अजगर सापडल्याची घटना उघडकीस आली आहे.
एवढ्या मोठ्या आकाराचा अजगर पाहिल्यानंतर स्थानिकांच्या अंगाचा थरकाप उडाला होता. परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, आज श्रावण सोमवारचे सकाळी मासोद येधील जिवनराव यांचे शेतात एक संशयास्पद हालचाल दिसून आली. जवळ जाऊन पाहिल्यावर त्यांच्या लक्षात आले की, तिथे एक प्रचंड मोठा अजगर विश्रांती घेत होता. अजगराचा अवाढव्य आकार पाहून स्थानिकांची धावपळ उडाली.
अजगराचा आकार आणि धोका लक्षात घेता, नागरिकांनी तातडीने न घाबरता संयम दाखवत याची माहिती सर्पमित्र कुणाल डोंगरे व वनविभागाला दिली. सर्पमित्र मंडळी व वनविभागाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
. सर्पमित्रांनी अत्यंत शिताफीने आणि सुरक्षितपणे या १३ फूट लांबीच्या अजगराला जेरबंद केले.व अजगराला ताब्यात घेतल्यानंतर उपस्थितांनी सुटकेचा श्वास सोडला. त्यानंतर या अजगराला मानवी वस्तीपासून दूर महाकाली जंगलात सुरक्षित अशा घनदाट नैसर्गिक अधिवासात सुखरूप सोडण्यात आले, अशी माहिती समोर आली आहे.
अशा प्रकारे मानवी वस्तीजवळ एवढा मोठा अजगर आढळल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे.


