ABKNEWSLIVE
दि. २० ऑक्टोबर : महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्यांच्या सीमेवरील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या कोडिसेलगुडेम येथील श्री रावणब्रह्मेश्वर स्वामी मंदिरात मंगळवारी भगवान रावणम्मा उरेगिंपू (शोभायात्रा) कार्यक्रम मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात पार पडला. गोंड आदिवासी समाजाचे आराध्य दैवत असलेल्या भगवान रावणब्रह्मेश्वर स्वामींच्या दर्शनासाठी महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील विविध भागांतून भाविक मोठ्या संख्येने दाखल झाले होते.तेलंगणातील हैदराबाद, हनमकोंडा, वरंगल, कालेश्वरम, खम्मम तसेच आंध्र प्रदेशातील विजयवाडा परिसरातून भाविक सहभागी झाले. महाराष्ट्रातील गडचिरोली, सिरोंचा आणि अहेरी परिसरातील गोंड समाजातील ज्येष्ठ नागरिक, युवक आणि महिला यांचीही मोठी उपस्थिती होती.
विशेष पूजा-अर्चा आणि पारंपरिक मिरवणूक
कार्यक्रमाची सुरुवात सकाळपासून स्वामींच्या विशेष अभिषेकाने, गोंगो पूजेने आणि महापूजेने करण्यात आली. त्यानंतर भगवान रावणब्रह्मेश्वर स्वामींची आकर्षक सजावट करून ढोल-ताशांच्या गजरात आणि पारंपरिक आदिवासी नृत्यांच्या साथीने भव्य शोभायात्रा काढण्यात आली.

ही मिरवणूक कोडिसेलगुडेम, ताटीगुडेम, कोट्टालगुडेम, चिंतलगुडेम आणि कमलापूर या गावांच्या मार्गावरून नेण्यात आली. पारंपरिक वाद्यांचा निनाद, आदिवासी संस्कृतीचे दर्शन आणि भाविकांचा उत्साह यामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.रावण हे आमच्या समाजाचे महान पंडित आणि वडीलधारे आहेत,’ अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. या परंपरेला गोंड आदिवासी समाजाच्या सांस्कृतिक अस्मितेच्या दृष्टीने विशेष महत्त्व असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.पुढील पिढीपर्यंत परंपरा पोहोचवण्याचा संकल्प,यावेळी इंदू ज्ञान वेदिका प्रबोध सेवा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, पिढ्यानपिढ्या चालत आलेली धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा जतन करून ती पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे हे समितीचे प्रमुख ध्येय आहे.दरम्यान, महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरील या ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व असलेल्या मंदिराचा पर्यटनस्थळ म्हणून विकास करण्यात यावा, अशी मागणी भाविकांकडून करण्यात आली. मंदिर परिसरात आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्यास या भागातील धार्मिक पर्यटनाला चालना मिळू शकते, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.
मान्यवरांसह भाविकांची उपस्थिती,या कार्यक्रमाला ग्राम माजी सरपंच सांबय्या गारू, डॉ. कन्ना मडावी (असोसिएट प्रोफेसर, मेडिकल कॉलेज, गडचिरोली), प्रो. हलामी (सायन्स कॉलेज, अहेरी), एपीआय मंगेश वळवी (रेवणपल्ली), मंदिराचे पुजारी, इंदू ज्ञान वेदिका प्रबोध सेवा समितीचे सदस्य आणि विविध भागांतून आलेले भाविक उपस्थित होते. कार्यक्रमानंतर भाविकांनी तीर्थप्रसादाचा लाभ घेतला.श्रीश्रीश्री आचार्य प्रबोधानंद योगीश्वर यांच्या दिव्य आशीर्वादाने आयोजित या कार्यक्रमातून धार्मिक श्रद्धा, आदिवासी संस्कृती आणि परंपरेच्या जतनाचा संदेश देण्यात आला.स्थळ : श्री रावणब्रह्मेश्वर मंदिर, कोडिसेलगुडेम, रावणब्रह्मेश्वर मंदिर, इंदू ज्ञान वेदिका प्रबोध सेवा समिती, कोडिसेलगुडेम.


