सिरोंचा प्रतिनिधी/ रमेश सप्पिडी
गडचिरोली जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या सिरोंचा तालुक्यातील पोस्ट असरअली अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये वीजपुरवठ्याच्या समस्येमुळे शेतकऱ्यांसमोर गंभीर संकट उभे ठाकले आहे. शेतात बोअरवेलची व्यवस्था असतानाही वीज उपलब्ध नसल्याने पाण्याअभावी धानपीक सुकू लागले आहे. डोळ्यांदेखत हाताशी आलेले पीक वाळत असल्याने शेतकरी हवालदिल झाले असून, प्रशासनाने तातडीने दखल घेण्याची मागणी होत आहे.केंद्र सरकारकडून ‘विकसित भारत’चा नारा दिला जात असताना गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम आणि सीमावर्ती भागातील शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक वीजपुरवठ्याची सुविधा मिळत नसल्याची खंत स्थानिक शेतकरी व्यक्त करीत आहेत. शेतीसाठी वीज उपलब्ध नसल्यामुळे पाण्याची व्यवस्था असूनही त्याचा उपयोग करता येत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.कष्टाने उभे केलेले धानपीक पाण्याअभावी धोक्यात,शेतकऱ्यांनी कर्ज काढून, मजुरांच्या मदतीने आणि मोठ्या मेहनतीने धानाची लागवड केली. मात्र, पिकाला पाण्याची गरज असताना वीजपुरवठा नसल्यामुळे विद्युत मोटारी चालवता येत नाहीत. परिणामी, सिंचनाअभावी हिरवेगार दिसणारे धानपीक पिवळे पडून सुकू लागल्याचे चित्र दिसत आहे.पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना पिकाला आवश्यक तेवढे पाणी देता येत नसल्याने उत्पादन घटण्याची भीती व्यक्त होत आहे. आधीच शेतीसाठी केलेला खर्च, कर्जाचा भार आणि त्यात पिकाचे नुकसान होण्याची शक्यता यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.सोलर पंप योजनेचा लाभ कितपत? शेतकऱ्यांचा सवालशासनाकडून शेतकऱ्यांसाठी सौरऊर्जेवर चालणाऱ्या कृषी पंपांच्या योजना राबविल्या जात आहेत. मात्र, असरअली परिसरातील काही शेतकऱ्यांना सोलर पंप बसवूनही अपेक्षित लाभ मिळत नसल्याची तक्रार आहे. सौरपंपाच्या वापराबाबत योग्य माहिती मिळत नसल्याने तसेच पाण्याची पुरेशी उपलब्धता होत नसल्याने शेतीच्या सिंचनाचा प्रश्न कायम असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.योजना कागदावर असण्यापेक्षा तिचा प्रत्यक्ष लाभ दुर्गम भागातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. अन्यथा, शेतकऱ्यांचा खर्च होऊनही शेतीचे नुकसान टाळता येणार नाही, अशी चिंता व्यक्त केली जात आहे.आम्ही शेती कशी करायची?’ शेतकऱ्यांचा प्रशासनाला सवाल,एकीकडे देशाच्या विकासाच्या मोठमोठ्या घोषणा केल्या जात आहेत, तर दुसरीकडे दुर्गम भागातील शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक वीजपुरवठ्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. वारंवार मागणी करूनही प्रश्न सुटत नसेल, तर शेतीचा खर्च कसा भागवायचा आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, असा सवाल शेतकरी उपस्थित करीत आहेत.
शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या
असरअली परिसरातील शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे पुढील मागण्या केल्या आहेत.
१. तातडीने पंचनामा: पाण्याअभावी नुकसानग्रस्त झालेल्या धानपिकाची कृषी व महसूल विभागामार्फत प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामा करण्यात यावा.
२. नुकसानभरपाई द्यावी:-नुकसानीचे मूल्यांकन करून शासनाच्या नियमानुसार पात्र शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई देण्यात यावी.
३. कृषी वीजपुरवठा सुरू करावा:-शेतकऱ्यांनी वारंवार केलेल्या मागण्यांची दखल घेऊन संबंधित शेतांमध्ये वीजपुरवठ्याची व्यवस्था करण्यात यावी.
४. सोलर पंपांची तपासणी करावी:- बसविण्यात आलेल्या सौर कृषी पंपांची कार्यस्थिती तपासून शेतकऱ्यांना त्यांचा प्रभावी वापर करता येईल, यासाठी आवश्यक मार्गदर्शन करण्यात यावे.
प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष
असरअली परिसरातील शेतकऱ्यांची व्यथा लक्षात घेता संबंधित वीज वितरण विभाग, कृषी विभाग आणि महसूल प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांच्या शेतातील प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी करून वीजपुरवठ्याचा प्रश्न सोडवावा आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नियमानुसार मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.दुर्गम भागातील शेतकऱ्यांना केवळ आश्वासने नकोत, तर शेती वाचविण्यासाठी प्रत्यक्ष उपाययोजना हव्यात. आता प्रशासन या गंभीर प्रश्नावर कितपत तत्परतेने कार्यवाही करते, याकडे असरअली परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
ABK NEWS LIVE | ग्रामीण भागातील जनतेचा आवाज


