ए बी के न्यूज लाईव्ह
वर्धा/अभय बेदमोहता
आनंदाच्या आणि उत्सावाच्या सणासुदीच्या वातावरणात वर्धा जिल्ह्यातील विरुळ आखाजी येथे मुलगा प्रणय चौधरी याने आपल्या जन्मदात्या वडील परमेश्वर चौधरी यांची वीट मारुन हत्त्या केल्याची हादरवून टाकणारी घटना घडली आहे. तान्ह्या पोळ्यासारख्या सणाच्या दिवशीच कौटुंबिक वादातून मुलाने आपल्या जन्मदात्या पित्याचा खून केल्याची संतापजनक घटना शुक्रवारी (दि. ११ सप्टेंबर) दुपारी घडली. विरुळ येथे घडलेल्या या थरारामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली असून, सणाच्या आनंदावर विरजण पडले आहे. मृतक परमेश्वर चौधरी आणि त्यांच्या पत्नीमध्ये वाद असल्याने पत्नी मुलगा प्रणय व मुलीसह रसुलाबाद येथे वेगळी राहत होती. परमेश्वर यांना यापूर्वी एका खुनी प्रकरणात शिक्षा झाली होती, जी भोगून ते विरुळ येथे वास्तव्यास होते. दरम्यान, त्यांच्या इतर संबंधांमुळे कुटुंबात सातत्याने कलह सुरू होता.शुक्रवारी (११ सप्टेंबर) सकाळी ११ ते १२ वाजताच्या सुमारास काही कामानिमित्त प्रणय विरुळ येथे आला असता त्याची वडिलांशी भेट झाली. या भेटीदरम्यान दोघांमध्ये जुन्या वादावरून बाचाबाची सुरू झाली. हा वाद इतका विकोपाला गेला की संतापाच्या भरात प्रणयने वडिलांवर हात उगारला. त्यानंतर जवळच पडलेली वीट उचलून परमेश्वर यांच्या डोक्यात आणि शरीरावर जोरदार प्रहार केला. या प्राणघातक हल्ल्यात गंभीर दुखापत झाल्याने परमेश्वर यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.तान्ह्या पोळ्याच्या दिवशी घडलेल्या या खुनाच्या सत्रामुळे गावात तणावपूर्ण शांतता पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच पुलगाव उपविभागीय पोलीस अधिकारी वंदना कारखैळे आणि ठाणेदार ढाकणे आपल्या पथकासह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. वर्धा जिल्ह्याच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षकांनीही घटनास्थळाची पाहणी केली. फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरून तांत्रिक पुरावे गोळा केले असून, पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पुलगाव येथील रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी मुलगा प्रणय चौधरी याला तात्काळ ताब्यात घेतले असून, पुलगाव पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.


