ए बी के न्युज लाईव्ह /सेलु/अभय बेदमोहता
तालुक्यातील रायपूर जंगली येथे वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. या मानवी हल्यामुळे संपूर्ण गावात प्रचंड संताप आणि शोककळा पसरली आहे. ग्रामस्थांनी केलेल्या तीव्र विरोधामुळे प्रशासनाला रात्री उशिरा बारा वाजेपर्यंत संघर्ष करावा लागला.तर यंदाच्या पोळा सणावरही या दुर्घटनेचे सावट असून गावकऱ्यांनी बैलजोड्या घरीच बांधून ठेवत यंदाचा बैलपोळा न करण्याचा एकमुखी निर्णय घेतला आहे. घटना घडल्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळीच घेराव घातला होता. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत मृतदेह हलवू देणार नाही, अशी ठाम भूमिका गावकऱ्यांनी घेतली. अखेर वरिष्ठांकडे मागण्या पोहोचवण्याचे आश्वासन दिल्यानंतर रात्री साधारण बारा वाजताच्या सुमारास मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी सेलू येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. मागण्यांवर येथील ग्रामस्थ अडून बसून असूनशवविच्छेदन पूर्ण झाल्यानंतर वनविभागाचे अधिकारी मृतदेह अंत्यसंस्कारासाठी रायपूर जंगली येथे घेऊन आले. मात्र, जोपर्यंत ठोस मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत मृतदेह स्वीकारणार नाही, असा पवित्रा घेत ग्रामस्थांनी मृतदेह स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला. त्यामुळे वनविभागाच्या अधिकाऱ्यांना मृतदेह पुन्हा परत नेण्यास भाग पडावे लागले. या प्रशासकीय व गावकऱ्यांमधील संघर्षाने सध्या गावात तणावपूर्ण शांतता आहे.ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा सर्वात लाडका आणि महत्त्वाचा सण असलेल्या ‘बैलपोळ्या’च्या पूर्व संध्येला गावात काळीछाया पसरली असून सर्जा-राज्याच्या स्वागतावीना पोळा पहिल्यांदाच पार पडणार आहे. वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार झाल्याने आणि संपूर्ण गाव दुःखात बुडाल्यामुळे यंदा रायपूर जंगलीमध्ये बैलांना सजवून सणाला जाण्याची परंपरा खंडित झाली आहे. पहिल्यांदाच गावातील सर्व शेतकऱ्यांनी आपल्या बैलजोड्या घरीच बांधून ठेवत कोणताही उत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. खासदार अमर काळे यांनी ही आज घटनास्थळी भेट देवून धुर्वे कुटुंबीयांचे व गावकऱ्यांचे सांत्वन करुन मागणी केली आहे की जेव्हा पर्यंत मृतकाच्या कुटुंबीयांना एक कोटीची मदत मिळण्याचे ठोस आश्वासन मिळणार नाही तेव्हा पर्यंत अंतिम संस्कार होणार नाही.या घटनेमुळे वनविभागाच्या कारभाराविरोधात आणि वाढत्या वन्यप्राण्यांच्या उपद्रवाविरोधात ग्रामीण जनतेमध्ये तीव्र रोष पाहायला मिळत आहे.


