अंकिसा प्रतिनिधी/वेंकटस्वामी चकिनाला
सिरोंचा : सिरोंचा तालुक्यातील लक्ष्मीदेवीपेठ ग्रामपंचायतीच्या वार्ड क्रमांक २ अंतर्गत येणाऱ्या मुघामेत्यम गावातील नागरिकांना आजही पक्क्या रस्त्याअभावी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्यात गावाकडे जाणारा कच्चा मार्ग चिखलमय होत असल्याने नागरिकांना अक्षरशः गुडघाभर चिखलातून मार्ग काढावा लागत आहे.गावात एखाद्या व्यक्तीची प्रकृती अचानक बिघडल्यास किंवा आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास सर्वाधिक अडचण निर्माण होते. गेल्या महिन्यात एका व्यक्तीची अचानक तब्येत बिघडल्यानंतर रुग्णवाहिकेशी संपर्क करण्यात आला. मात्र, खराब आणि चिखलाने भरलेल्या रस्त्यामुळे चारचाकी वाहन गावापर्यंत पोहोचू शकले नाही. अखेर संबंधित व्यक्तीला बैलगाडीच्या सहाय्याने मुख्य रस्त्यापर्यंत आणण्यात आले. मात्र, तोपर्यंत दुर्दैवी परिस्थिती निर्माण झाल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.अशाच प्रकारे काही दिवसांपूर्वी एका गर्भवती महिलेला रात्रीच्या वेळी अचानक प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्या. रुग्णवाहिकेला गावापर्यंत पोहोचणे शक्य नसल्याने आशा सेविकेने दुचाकीच्या सहाय्याने महिलेला मुख्य रस्त्यापर्यंत आणले. त्यानंतर रुग्णवाहिकेतून महिलेला पुढील उपचारासाठी नेण्यात आले.आरोग्यसेवा, आपत्कालीन सेवा आणि नागरिकांच्या दैनंदिन जीवनासाठी रस्ता ही मूलभूत गरज असताना गावाला आजही पक्का रस्ता का मिळत नाही? असा सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.स्वातंत्र्याला अनेक दशके उलटून गेल्यानंतरही ग्रामीण भागातील नागरिकांना पावसाळ्यात चिखलातून वाट काढावी लागत असेल, तर ग्रामीण विकासाच्या योजना नेमक्या कुठे पोहोचत आहेत? असा प्रश्नही उपस्थित होत आहे.प्रशासनाने या गावातील रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी करून तातडीने मुरूम टाकून रस्ता वाहतुकीयोग्य करावा तसेच कायमस्वरूपी पक्का रस्ता मंजूर करून बांधकाम सुरू करावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.


