सेलु/अभय बेदमोहता
तालुक्यातील सेलडोह येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली महिलांकडून पैसे उकळण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अपात्र महिलांना पुन्हा लाभ मिळवून देण्याचे आमिष दाखवून हा गोरखधंदा सुरू होता, मात्र सतर्क नागरिकांमुळे आणि पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला. सोमवार दि. ७ सप्टेंबर चे रात्रीचे सुमारास हा प्रकार उघडकीस आला.गावातील महिलांना रात्रीच्या वेळी एकत्र करून बैठक घेतली जात होती. योजनेतून अपात्र ठरलेल्या महिलांना पुन्हा लाभ मिळवून देण्याचे आश्वासन देऊन प्रत्येक महिलेकडून ५० रुपये घेतले जात होते.मंगेश रंगारी, राहुल लाडीस्कर, चंद्रशेखर शेवडे, सतीश लाडीस्कर आणि कान्हा धोंगडे यांनी महिलांकडे ओळखपत्राची मागणी केली होती.याप्रकरणी मुंबईचा पत्ता असलेली ‘अखिल भारतीय जनवादी महिला संघटना महाराष्ट्र राज्य कमिटी’ या नावाच्या २० रुपयांच्या पावत्या देण्यात आल्याचे समोर आले. या प्रकारची माहिती पोलीस पाटील यांच्या पत्नी योगराज कोरते यांनी सिंदी (रे.) पोलीस ठाण्याला दिली. माहिती मिळताच बिट जमादार धनराज सयाम यांनी घटनास्थळी धाव घेत संपूर्ण प्रकाराची माहिती घेतली.लगेच महिलांकडून घेतलेले ५० रुपये त्यांना परत करण्यात आले, महिलांनी भरलेले अर्ज फाडून टाकण्यात आले आणि संबंधितांना तेथून रवाना करण्यात आले यापुढे कोणतीही अज्ञात व्यक्ती किंवा संस्थेला आपले आधार कार्ड किंवा इतर वैयक्तिक कागदपत्रे देऊ नयेत.व कोणत्याही आमिषाला किंवा दिशाभूल करणाऱ्या प्रचाराला बळी पडू नये म्हणून सांगितले गेले.शासकीय योजनेची माहिती फक्त अधिकृत कार्यालयातूनच घ्यावी आणि संशयास्पद व्यक्ती आढळल्यास त्वरित पोलिसांना कळवावे अशी माहिती दिली.


