ए बी के न्यूज लाईव्ह
वर्धा / अभय बेदमोहता
विदर्भाच्या मातीत संस्कृती आणि परंपरांचे जे इंद्रधनुषी रंग उधळले जातात, त्याची गोष्टच निराली आहे. नागपूरची मारबत आणि पांढुर्णाच्या गोटमारप्रमाणेच वर्धा जिल्ह्यातील सिंदी (रेल्वे) चा ऐतिहासिक ‘ताना पोळा’ हा संपूर्ण विदर्भाचा सर्वात मोठा आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो. शतकानुशतके जुनी परंपरा जोपासणारा हा बालगोपाळांचा लाकडी नंदी पोळा आता आपल्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाकडे (१५० व्या वर्षाकडे) दिमाखात वाटचाल करत आहे. आगामी ११ सप्टेंबरला हा ऐतिहासिक उत्सव एका भव्य आणि विशाल लोकोत्सवा म्हणून मोठ्या हर्षोल्लासामध्ये साजरा केला जाणार आहे.या भव्य पोळ्याची सर्वात मोठी ओळख म्हणजे १९ व्या शतकाच्या सुरुवातीला तयार केलेला जयस्वाल कुटुंबाचा पारंपरिक लाकडी ‘मानाचा नंदी’ होय. या उत्सवाचे सौंदर्य असे की, येथे तांदळाच्या दाण्यावर कोरलेल्या सूक्ष्म नंदीपासून ते तब्बल ६ फूट उंच भव्य लाकडी नंदी बैलापर्यंत सगळे पाहायला मिळते. आकर्षक सजावट आणि झगमगाटी रोषणाई प्रत्येक येणाऱ्या पर्यटकाचे मन मोभून घेते. या पोळ्याच्या तब्बल एक महिना आधीपासूनच सिंदीवासीयांमध्ये तयारीला सुरुवात होते आणि उत्सवाच्या ६-७ दिवस आधी संपूर्ण शहर नवरीप्रमाणे सजते.या अनोख्या जत्रेत दरवर्षी विदर्भातून जवळपास ७० ते ८० हजार लोकांचा जनसागर लोटतो. कधीकधी विदेशी पर्यटकांची उपस्थिती देखील नोंदवली जाते. लाकडी नंदी बैलांना सुंदर सजवून ट्रॅक्टर आणि ट्रॉलीजवर विराजमान केले जाते, ज्यांच्या पुढे समाजाला संदेश देणाऱ्या पौराणिक आणि सामाजिक चित्ररथी (झाक्या) सजवल्या जातात.ढोल-ताशांच्या तालावर आणि तरुणांच्या उत्साहात नंदी बैलांची भव्य शोभायात्रा बाजार चौकाच्या दिशेने निघते. या आयोजनात नंदी मालक आणि मंडळ समित्यांकडून ३ ते ५ लाख रुपयांपर्यंतचा खर्च केला जातो. उत्सवात जवळपास २५ ते ३० मंडळे आपली कला सादर करतात. विशेष म्हणजे, स्थानिक आमदार समीर कुणावार यांच्याकडून दरवर्षी चित्ररथी निर्मात्यांना आर्थिक मदत दिली जाते, ज्यामुळे या उपक्रमाला जनसहभागातून चालणाऱ्या खऱ्या अर्थाने लोकोत्सवाचे रूप प्राप्त होते.पोळ्याच्या या पवित्र पर्वावर सिंदीच्या प्रत्येक घरात पाहुण्यांची रेलचेल आणि उत्सवाचे वातावरण असते. नगरपरिषद, प्रशासन आणि पोलीस विभागाकडून कायदा-सुव्यवस्था व सुरक्षेचे चोख बंदोबस्त ठेवले जातात. विदर्भाच्या सांस्कृतिक वारशाचा हा अमूल्य आणि ऐतिहासिक क्षण डोळ्यात साठवण्यासाठी दूरदूरवरून लोक सिंदी (रेल्वे) येथे पोहोचतात.


