गुमुलांकोंडा ग्रामीण प्रतिनिधी/रमेश सप्पीडी
सिरोंचा :
गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातील सोमनूर (जुने) येथे अंगणवाडीला लागून असलेले सुमारे ४०० वर्षे जुने भलेमोठे चिंचेचे झाड मंगळवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास अचानक कोसळले. या घटनेत मोठे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.गाव वाच्या मध्यभागी असलेल्या या ऐतिहासिक झाडाला गावकऱ्यांच्या भावनिक आठवणी जोडलेल्या होत्या. चार पिढ्यांपासून या झाडाची सावली आणि आधार गावाला लाभला होता. झाडाखाली पंचायतच्या बैठका तसेच गावातील विविध विषयांवर चर्चा होत असत.झाड कोसळल्याने अंगणवाडीसमोरील बोअरिंग व हँडपंपचे नुकसान झाले आहे. तसेच असरअल्लीकडून सोमनूरकडे येणारी मुख्य वीजवाहिनी झाडावर पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला असून वीजतारा जमिनीवर आल्या आहेत.मोठा अनर्थ टळला,घटना घडली त्यावेळी सायंकाळची वेळ असल्याने अंगणवाडीतील मुले घरी गेलेली होती. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली. झाडाच्या पूर्वेला अंगणवाडी, तर पश्चिमेला पुलसे रमेश यांचे घर आहे. झाड घरावर कोसळले असते तर मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती.घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामस्थांनी या झाडाशी असलेल्या भावनिक नात्याबद्दल सांगताना, “हे झाड आमच्या गावचा देवच होते. त्याच्या कृपेने मोठा अनर्थ टळला,” अशी भावना व्यक्त केली.वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी,महावितरणने तातडीने जमिनीवर आलेल्या वीजतारा हटवून वीजपुरवठा सुरळीत करावा. तसेच ग्रामपंचायत गुम्मलकोंडा यांनी पडलेले झाड हटवून नुकसान झालेला हँडपंप दुरुस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.


