सेलू / अभय बेदमोहता
सेलू :-
नागपूरहून माहूरच्या दिशेने दर्शनासाठी जात असलेल्या प्रवासी ट्रॅव्हलरचा सेलूजवळील रमणा फाट्याजवळ शनिवारी दुपारी अपघात झाला. ओव्हरटेक करताना ट्रॅव्हलरची टिप्परला धडक बसल्याने सुमारे १२ भाविक जखमी झाले.अपघाताची माहिती मिळताच सेलू पोलीस, महामार्ग पोलीस, रेस्क्यू टीम आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने बाहेर काढून तीन रुग्णवाहिकांच्या मदतीने सेवाग्राम व वर्धा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.गुजरात येथील भाविक माहूरच्या दर्शनासाठी प्रवास करत होते. शनिवारी दुपारी सुमारे २.१५ वाजता रमणा फाट्याजवळ जेएच-०५ टीसी-१८५१ क्रमांकाच्या टिप्परला ओव्हरटेक करत असताना डी.डी.-०३ डब्ल्यू-९६६६ क्रमांकाच्या ट्रॅव्हलरची टिप्परला धडक झाली.या अपघातात अनेक प्रवासी जखमी झाले. जखमींची प्रकृती आणि दुखापतींचे स्वरूप वैद्यकीय तपासणीनंतर स्पष्ट होणार आहे.घटनास्थळी पोलीस ठाणेदार पंकज वाघोडे, उपनिरीक्षक निरंजन वरभे, प्रवीण भोयर, उमेश उगले, जावेद धामिया, मंगेश राऊत व सुनील चावरे यांनी तातडीने मदतकार्य केले. अपघातामुळे विस्कळीत झालेली वाहतूकही पोलिसांनी सुरळीत केली.अपघाताचा पुढील तपास सेलू पोलीस करीत असून, नेमका अपघात कशामुळे झाला याचा तपास सुरू आहे.


