मुख्य संपदक/अशोक कुम्मरी
सिरोंचा : तालुक्यात सध्या डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांची भीती वाढत असताना सिरोंचा ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रुग्णालयातील बेडवर वेळेवर चादरी उपलब्ध नसल्याच्या तक्रारी असून, स्वच्छतेकडेही पुरेसे लक्ष दिले जात नसल्याचा आरोप रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांकडून केला जात आहे.गेल्या तीन दिवसांपासून रुग्णालयात उपचारासाठी एकच डॉक्टर उपलब्ध असल्याचे रुग्णांचे म्हणणे आहे. प्रत्यक्षात डॉक्टरांची संख्या तीन-चार असताना इतर डॉक्टर नियमितपणे उपलब्ध का नाहीत, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.विशेष म्हणजे, सध्या ताप, डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांचे रुग्ण वाढण्याची शक्यता असताना रुग्णालयात पुरेसे वैद्यकीय मनुष्यबळ उपलब्ध नसल्यास परिस्थिती गंभीर होऊ शकते. गंभीर रुग्णांना पुढील उपचारासाठी अहेरीकडे पाठवावे लागते; मात्र पावसाळ्यातील खराब रस्ते आणि वाहतुकीच्या अडचणींमुळे वेळेत अहेरी गाठणेही अनेक रुग्णांसाठी मोठे आव्हान ठरत आहे.सिरोंचा हे जिल्ह्याच्या अतिदुर्गम टोकावरील तालुक्याचे ठिकाण असून, येथील नागरिकांसाठी ग्रामीण रुग्णालय हे प्रमुख शासकीय आरोग्य केंद्र आहे. यापूर्वीही या रुग्णालयातील रिक्त पदे आणि अपुऱ्या आरोग्य सुविधांबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.आरोग्य विभागाने तातडीने रुग्णालयातील डॉक्टरांची उपस्थिती, स्वच्छता व्यवस्था, बेडवरील चादरी आणि रुग्णांना वेळेवर उपचार मिळत आहेत की नाही, याची तपासणी करावी. तसेच डॉक्टरांची कमतरता असल्यास अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.डेंग्यू-मलेरियाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य व्यवस्था तातडीने सुधारली नाही तर रुग्णांच्या जीविताला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.


