सिरोंचा:
सिरोंचा तालुका मुख्यालयापासून अवघ्या ३२ किमी अंतरावर असलेल्या जाफ्राबाद चेक ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या चार गावांमध्ये मूलभूत सुविधांचा मोठा अभाव दिसून येत आहे. स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.जाफ्राबाद चेक ग्रामपंचायतीच्या हद्दीत एकूण चार गावांचा समावेश होतो. गावात पक्के रस्ते आणि पाण्याचा निचरा होण्यासाठी नाल्या नसल्याने नागरिकांना दैनंदिन रहदारीसाठी कसरत करावी लागत आहे. विशेषतः पावसाळ्यात रस्त्यांवर चिखलाचे साम्राज्य पसरत असल्याने या चारही गावातील नागरिकांचे हाल होतात. गावात स्वच्छता राखणे, रस्ते व नाली बांधकाम करणे ही ग्रामपंचायत प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी असतानाही प्रशासनाला याचा विसर पडल्याचे चित्र आहे.परिसरातील रमेश दुर्गम यांच्या घरापासून ते वेंकटी कुम्मारी यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रीट (CC) रस्ता तयार करण्यात यावा, अशी आग्रही मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. यासंदर्भात नागरिकांनी अनेक वेळा ग्रामपंचायत प्रशासनाला भेट देऊन निवेदने दिली; मात्र प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन या चारही गावांमधील समस्या सोडवाव्यात आणि मूलभूत सोयीसुविधा निर्माण कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.


