सेलू/अभय बेदमोहता :
सेलू तालुक्यातील ग्रामपंचायत दहेगाव (गो) येथे बनावट ग्रामसभा ठराव, नाहरकत प्रमाणपत्र (NOC) आणि कथित भ्रष्टाचाराच्या आरोपावरून ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. सोमवार, दि. 31 ऑगस्ट 2026 रोजी पंचायत समिती सेलूचे गटविकास अधिकारी देवानंद पाणबुडे यांच्या उपस्थितीत विशेष ग्रामसभा घेण्यात आली. मात्र, या ग्रामसभेत संबंधित प्रकरणाबाबत समाधानकारक उत्तरे न मिळाल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी थेट पोलिस ठाणे गाठून सरपंच व ग्रामसेवकांविरुद्ध फौजदारी तक्रार दाखल केली.मौजा किन्हाळा येथील सर्वे नं. 26/1/2, क्षेत्र 2.00 हेक्टर आर. मध्ये श्रीमती कल्पना मडावी यांच्या खानपट्ट्यासाठी ग्रामपंचायतीकडून नाहरकत प्रमाणपत्र देण्यात आले होते. या नाहरकत प्रमाणपत्रासाठी ग्रामसभेचा ठराव आवश्यक असताना, सरपंच व ग्रामसेवक यांनी संगनमत करून दि. 20 मे 2026 रोजीच्या मासिक सभेच्या ठराव क्र. 7 मध्ये फेरफार करून त्यास दि. 29 मे 2026 रोजी झालेल्या ग्रामसभेचा ठराव असल्याचे दाखविल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.दरम्यान, दि. 25 ऑगस्ट 2026 रोजी पंचायत समितीच्या चौकशी समितीने ग्रामपंचायतीचे आठ रजिस्टर जप्त केले होते. तपासणीदरम्यान प्रोसेडिंग बुकमध्ये खोडतोड तसेच वेगवेगळ्या शाईचा वापर आढळून आल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. याबाबत ग्रामसेवकांनी तोंडी कबुली दिल्याचाही दावा ग्रामस्थांनी केला आहे.सोमवारी झालेल्या विशेष ग्रामसभेत ग्रामस्थांनी संबंधित प्रकरणावर विविध प्रश्न उपस्थित केले. मात्र, समाधानकारक उत्तरे मिळाली नसल्याने ग्रामस्थांनी दहेगाव (गो) पोलिस ठाणे गाठले. यावेळी सरपंच व ग्रामसेवकांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली असून, स्टेशन डायरी क्र. 154, दि. 31 ऑगस्ट 2026 अन्वये तक्रार नोंदवण्यात आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.या प्रकरणात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 318(4), 336(3) व 340 अन्वये गुन्हा दाखल करून मूळ प्रोसेडिंग बुक जप्त करावे, तसेच संबंधित खानपट्ट्यांना देण्यात आलेली नाहरकत प्रमाणपत्रे रद्द करावीत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.या प्रकरणातील प्रोसेडिंग बुकचे फोटो, व्हिडिओ, पंचनामा तसेच नाहरकत प्रमाणपत्रांसह उपलब्ध पुरावे आमदार समीर कुणावार यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्हा खनिकर्म अधिकारी तसेच जिल्हा परिषद वर्धाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सादर करण्यात येणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.विशेष ग्रामसभेला तलाठी, विस्तार अधिकारी, मुख्याध्यापक तसेच दहेगाव (गो) व किन्हाळा येथील शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते.निवेदक : समस्त ग्रामस्थ, दहेगाव (गो) व किन्हाळा


