वेंकटस्वामी चकिनाला /अंकिसा प्रतिनिधी
सिरोंचा तालुक्यातील मौजा रंगधामपेठा चक येथील शेतकऱ्यांच्या शेताकडे जाणारा शासकीय शेतरस्ता अनेक वर्षांपासून अतिक्रमित असल्याने तो पूर्णपणे मोकळा करून देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. याबाबत ग्रामस्थांनी २४ ऑगस्ट रोजी तहसीलदार तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी, सिरोंचा यांच्याकडे निवेदन सादर केले.निवेदनानुसार, सदर शासकीय शेतरस्ता महसूल अभिलेख व गाव नकाशामध्ये नमूद असतानाही प्रत्यक्ष वापरासाठी उपलब्ध नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना आपल्या शेतात जाण्यासाठी अडचणी निर्माण होत असून शेतीची मशागत, पेरणी, कापणी तसेच धान्य व शेतीमालाची वाहतूक करण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे.रस्ता बंद असल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील बांध तुटणे, नुकसान होणे तसेच जनावरांच्या वाहतुकीसाठीही अडचणी निर्माण होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. काही जमीनमालकांनी पूर्वीच्या मालकांकडून जमीन खरेदी केली असून रस्त्याच्या जागेचा अतिक्रमणाशी संबंधित प्रश्न प्रत्यक्ष मोजणीनंतर स्पष्ट होऊ शकतो, असेही ग्रामस्थांनी म्हटले आहे.महसूल अभिलेख, गाव बंधोबस्त नकाशा व सन १९९९ च्या गाव नकाशानुसार प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून शासकीय शेतरस्त्याची मोजणी करावी आणि रस्त्यावर झालेले अतिक्रमण हटवून शेतकऱ्यांसाठी रस्ता पूर्णपणे खुला करून द्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.या निवेदनावर रंगधापेठा चक येथील १२ ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या असून निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी, गडचिरोली, पोलीस अधीक्षक, गडचिरोली तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी (महसूल), अहेरी यांना माहिती व आवश्यक कार्यवाहीसाठी देण्यात आली आहे.


