सेलू /अभय बेदमोहता
प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या वतीने दादी प्रकाशमणि यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ देशभरातील सेवाकेंद्रांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान महाअभियानांतर्गत सेलू येथे मंगळवारी (२५ ऑगस्ट) रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. ब्रह्माकुमारीज् शिवशक्ती भवन, भगत ले-आउट येथे सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत झालेल्या या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
‘रक्तदान करा, कल्याण करा’ या संदेशातून नागरिकांना रक्तदानासाठी प्रेरित करण्यात आले. अपघात, शस्त्रक्रिया, प्रसूती तसेच विविध आजारांवरील उपचारादरम्यान रुग्णांना मोठ्या प्रमाणात रक्ताची गरज भासते. त्यामुळे रक्तदान हे केवळ सामाजिक कर्तव्य नसून गरजू रुग्णाच्या जीवनाला आधार देणारे महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
शिबिराला ग्रामीण रुग्णालय सेलूच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. वांदिले प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. यावेळी ब्रह्माकुमारीज् वर्धा सेवाकेंद्राच्या संचालिका माधुरी दीदी, सेलू सेवाकेंद्राच्या संचालिका दर्शना दीदी यांच्यासह जेष्ठ समाज कार्यकर्ता रामेश्वरजी धर्मुळ, प्रकाश भाऊ डुकरे,ग्रामीण रुग्णालय वर्धा येथील डॉ. प्रविण गावंडे, डॉ. चित्राक्षी, सिस्टर वैशाली जगताप व अंकुश कांचनपूरे उपस्थित होते.
रक्तदात्यांचा उत्साह वाढविण्यासाठी त्यांना सुविचार व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. मानवतावादी दृष्टिकोनातून आयोजित या उपक्रमामुळे रक्तदानाविषयी जनजागृती होण्यासोबतच गरजू रुग्णांसाठी रक्तसाठा उपलब्ध होण्यास मदत झाली.


