सेलु/अभय बेदमोहता
नागपूर-वर्धा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ वरील ढाब्याजवळ रस्त्याच्या कडेला जखमी अवस्थेत आढळलेल्या अनोळखी महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना २३ऑगस्ट रोजी मध्यरात्री २४ च्या पहाटेच्या सुमारास उघडकीस आली.
हळदगाव टोलनाका येथील ढाब्याजवळ महामार्गाच्या कडेला एक महिला पडून असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली.महिला अंदाजे ४० ते ४५ वर्षांची असून ती जखमी अवस्थेत रस्त्याच्या कडेला आढळून आली. तिला तत्काळ रुग्णवाहिकेने ग्रामीण रुग्णालय, सेलू येथे दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.मृत महिलेने पिवळ्या व लालसर रंगाची साडी आणि फिकट गुलाबी रंगाचा ब्लाउज परिधान केला होता. तिच्या गळ्यात पांढऱ्या प्लास्टिकच्या मण्यांची माळ होती. तिच्याजवळील पिशवीची पाहणी केली असता ओळख पटविणारे कोणतेही कागदपत्र आढळले नाही. त्यामुळे मृत महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही.
या प्रकरणी सेलू पोलिसांनी नोंद घेऊन मृत महिलेची ओळख पटविण्यासह घटनेचा तपास सुरू केला आहे.


