सिरोंचा:-
टेकडा:
पावसाळ्याचे दिवस सुरू असतानाच टेकडा परिसरातील ३० हून अधिक गावांचा वीज पुरवठा रात्रभर खंडित झाल्याने नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. एकीकडे उकाडा आणि दुसरीकडे पावसाळ्यामुळे वाढलेला डासांचा प्रादुर्भाव, अशा दुहेरी संकटात ग्रामस्थांची संपूर्ण रात्र जागून गेली.
मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्री तांत्रिक बिघाडामुळे परिसरातील ३० गावांची वीज अचानक खंडित झाली. महावितरणकडून दुरुस्तीचे काम वेळेत न झाल्याने संपूर्ण रात्र अंधारातच काढावी लागली. पावसाळ्याचे दिवस असल्याने सध्या परिसरात ठिकठिकाणी पाणी साचून डासांची मोठी समस्या निर्माण झाली आहे. रात्रभर वीज नसल्याने पंखे बंद होते, त्यामुळे डासांच्या चाव्याने नागरिक विशेषतः लहान मुले आणि वृद्ध त्रस्त झाले.
साथीच्या आजारांचा धोका वाढला
पावसाळ्यामुळे डासांचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. डासांच्या या उपद्रवामुळे डेंग्यू, मलेरिया आणि तापासारख्या साथीच्या आजारांचा प्रसार होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यातच वारंवार वीज जात असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
महावितरण व प्रशासनाविरोधात संताप
वीज गेल्यावर महावितरणच्या कर्मचाऱ्यांना संपर्क साधूनही योग्य प्रतिसाद मिळाला नाही, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. “एकीकडे पावसाळ्यात डासांचा त्रास वाढला आहे आणि दुसरीकडे रात्र-रात्र वीज घालवली जात आहे. प्रशासनाने तात्काळ वीज पुरवठा सुरळीत करावा आणि गावात औषध व धूर फवारणी (फॉगिंग) करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू,” असा इशारा संतप्त ग्रामस्थांनी दिला आहे.


