सिरोंचा तालुक्यातील अंकिसा येथे दर मंगळवर आठवड्याला भरला जाणारा साप्ताहिक भाजीपाला बाजार सध्या मुख्य रस्त्यावर (नॅशनल हायवे) भरत असल्यामुळे नागरिक आणि वाहनचालकांसाठी मोठा धोका निर्माण झाला आहे.बाजारासाठी ग्रामपंचायत अंकिसा यांनी स्वतंत्र नियोजित जागा उपलब्ध करून दिली असतानाही काही व्यापाऱ्यांनी मुख्य रस्त्यावरच दुकाने लावण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे रस्त्यावर गर्दी वाढून वाहतुकीत अडथळा निर्माण होत आहे.विशेषतः बाजाराच्या दिवशी वाहनांची ये-जा मोठ्या प्रमाणात होत असल्याने अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. स्थानिक नागरिकांनी याबाबत अनेक वेळा तक्रारी केल्या असूनही अद्याप ठोस कारवाई झालेली नाही.ग्रामपंचायतीने बाजारासाठी दिलेल्या जागेवरच दुकाने लावावीत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. तसेच संबंधित कंत्राटदारांनी नियमांचे पालन करावे, अन्यथा प्रशासनाने कडक कारवाई करावी, अशी मागणीही जोर धरत आहे.