गडचिरोली येथे आयोजित ग्रामीण रुग्णालय, सिरोंचा येथे मोफत हृदय तपासणी शिबिरासाठी आलेल्या ५ वर्षीय श्रावीण चेन्नूरी याची इंजेक्शन दिल्यानंतर प्रकृती बिघडून मृत्यू झाल्याच्या घटनेची निष्पक्ष व सखोल चौकशी करावी, अशी मागणी तालुका पत्रकार संघटनेने केली आहे.रंगयापल्ली येथील मोहन व गंगू चेन्नूरी यांचा मुलगा श्रावीण याला आरोग्य विभागाच्या माध्यमातून हृदय तपासणी शिबिरासाठी आणण्यात आले होते. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, ग्रामीण रुग्णालयातील वॉर्डमध्ये इंजेक्शन दिल्यानंतर काही वेळातच त्याची प्रकृती बिघडली व त्याचा मृत्यू झाला.घटनेतील इंजेक्शनचे नाव, बॅच क्रमांक, मात्रा, उपचार नोंदी, CCTV फुटेज व संबंधित वैद्यकीय कागदपत्रांची तपासणी करून स्वतंत्र समितीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे. दोष निश्चित झाल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करून कुटुंबाला शासन नियमानुसार मदत व नुकसानभरपाई द्यावी, अशीही मागणी करण्यात आली.निवेदन देताना तालुका पत्रकार संघटनेचे अध्यक्ष सागर मूलकला, उपाध्यक्ष मुरलीधर मारगोनी, सचिव अशोक कुम्मरी यांच्यासह पत्रकार व ग्रामस्थ उपस्थित होते. १५ दिवसांत न्याय न मिळाल्यास कायदेशीर व लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे.