सिरोंचा :
सिरोंचा ते आसारअलीकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याच्या मधोमध मोठा खड्डा पडल्याने वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या खड्ड्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत असून, अपघाताचा धोका वाढला आहे.रस्त्याच्या मधोमध पडलेल्या या खड्ड्याची तीव्रता लक्षात घेता काही नागरिकांनी खड्ड्याच्या ठिकाणी झाडांच्या फांद्या व लाकूड टाकून वाहनचालकांना सावध करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र हा कायमस्वरूपी उपाय नसून संबंधित विभागाने तातडीने खड्डा बुजवून रस्त्याची दुरुस्ती करणे गरजेचे आहे.विशेषतः रात्रीच्या वेळी हा खड्डा वाहनचालकांच्या लक्षात न आल्यास दुचाकीस्वारांचा गंभीर अपघात होण्याची शक्यता आहे. पावसाळ्यात खड्ड्यात पाणी साचल्यास त्याची खोली लक्षात येत नसल्याने धोका आणखी वाढू शकतो. या मार्गावरून दररोज दुचाकी, चारचाकी तसेच मालवाहू वाहनांची मोठ्या प्रमाणात ये-जा होत असते.राष्ट्रीय महामार्गावर अशा प्रकारचा खड्डा दीर्घकाळ राहणे हे वाहनचालकांच्या जीवितास धोकादायक ठरू शकते. त्यामुळे संबंधित राष्ट्रीय महामार्ग विभागाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने घटनास्थळी पाहणी करावी, खड्डा बुजवावा आणि रस्त्याची कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, अशी मागणी वाहनचालक व परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.खड्डा बुजविण्यासाठी आणखी एखादा अपघात होण्याची वाट पाहू नये, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत असून प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.


