सोमनूर जुना प्रतिनिधी / रमेश सप्पीडी
महाराष्ट्र-तेलंगणा सीमाभागात लोकप्रिय असलेल्या बथुकम्मा या पारंपरिक फुलांच्या उत्सवाची धूम सोमनूर (जुना) गावात पाहायला मिळत आहे. फुलांची आकर्षक सजावट, पारंपरिक गीते आणि सामूहिक नृत्य अशा उत्साहपूर्ण वातावरणात हा उत्सव साजरा केला जात आहे.बथुकम्मा उत्सवाच्या तिसऱ्या दिवशी गावात विशेष तयारी करण्यात आली. यानिमित्ताने गावातील महिला व पुरुष एकत्र येऊन उत्सवात सहभागी होत आहेत. महिला विविध रंगीबेरंगी फुलांचा वापर करून आकर्षक आणि सुबक बथुकम्मा तयार करतात. त्यानंतर पारंपरिक बथुकम्मा गीते गात महिला फेर धरून नृत्य करतात. या परंपरेमुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण होते.सोमनूर (जुना) गावात गेल्या अनेक वर्षांपासून बथुकम्मा उत्सवाची परंपरा जपली जात आहे. दरवर्षी गावकरी एकत्र येऊन मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने हा सण साजरा करतात. यंदाही गावातील नागरिकांचा उत्सवाला चांगला प्रतिसाद मिळत असून, पारंपरिक संस्कृतीचे दर्शन घडत आहे.बथुकम्मा हा केवळ फुलांचा उत्सव नसून, महिलांच्या सहभागातून जपली जाणारी परंपरा, सामाजिक एकोपा आणि सांस्कृतिक वारशाचे प्रतीक आहे.** सोमनूर (जुना) येथील उत्सवातून सीमाभागातील समृद्ध लोकसंस्कृती आणि परंपरेप्रती असलेली गावकऱ्यांची आत्मीयता अधोरेखित होत आहे.
ABK NEWS LIVE | सोमनूर (जुना)


