नेलगुंडा
भामरागड :-गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त आणि दुर्गम भागातील नागरिकांना पावसाळ्यात दळणवळणासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. नाले व ओढ्यांना पाणी आल्याने नागरिकांची ये-जा अडचणीची ठरते. ही समस्या लक्षात घेऊन पोलीस स्टेशन नेलगुंडा येथील पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थांनी एकत्र येत श्रमदानातून बोगामी नाल्यावर पूल उभारणीचे महत्त्वपूर्ण काम हाती घेतले.या उपक्रमासाठी गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक मा. एम. रमेश, अभियान विभागाचे मा. सत्यसाई कार्तिक, प्रशासन विभागाचे मा. गोकुळ, प्राणहिता येथील अतिरिक्त पोलीस अधीक्षक मा. हर्षवर्धन तसेच भामरागडचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.पोलीस स्टेशन नेलगुंडाचे प्रभारी अधिकारी अजिंक्य इथापे, सहाय्यक परीक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक राहुल जेंगठे, पोलीस स्टेशन नेलगुंडा येथील सर्व पोलीस अंमलदार, एसआरपीएफ जालना गट क्रमांक ३ चे पोलीस उपनिरीक्षक मोराणकर आणि एसआरपीएफचे अंमलदार यांनी या उपक्रमात सहभाग घेतला. नेलगुंडा येथील गावपाटील महेश वरसे आणि ग्रामस्थांनीही श्रमदान करून सहकार्य केले.
शेतकरी, विद्यार्थी आणि ग्रामस्थांना होणार फायदा,बोगामी नाल्यातून ये-जा करताना स्थानिक नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. विशेषतः पावसाळ्यात नाल्याला पाणी आल्याने शेतकरी, विद्यार्थी, महिला आणि इतर नागरिकांच्या दळणवळणाचा प्रश्न गंभीर बनत होता. ही गैरसोय दूर करण्याच्या उद्देशाने पोलीस दल आणि ग्रामस्थांनी एकत्र येत पूल उभारणीसाठी पुढाकार घेतला.कायदा-सुव्यवस्थेसोबतच जनसेवेचा आदर्शपोलीस दलाची भूमिका केवळ कायदा व सुव्यवस्था राखण्यापुरती मर्यादित नसून, दुर्गम भागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी सहकार्य करणेही महत्त्वाचे आहे. नेलगुंडा येथे राबविण्यात आलेला हा श्रमदान उपक्रम त्याचेच उदाहरण ठरत आहे.पोलीस आणि जनता यांच्यातील विश्वासाचे नाते अधिक दृढ करणे, तसेच दुर्गम भागातील नागरिकांच्या दैनंदिन समस्या सोडविण्यासाठी लोकसहभागातून प्रयत्न करणे, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे,पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थ यांच्या संयुक्त सहभागातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे स्थानिक नागरिकांच्या दळणवळणाची समस्या कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच पोलीस दल आणि नागरिक यांच्यातील परस्पर विश्वास, समन्वय आणि सहकार्य अधिक मजबूत होण्यास हातभार लागणार आहे.नेलगुंडा पोलिसांचा पुढाकार आणि ग्रामस्थांचे श्रमदान यांतून साकारलेला हा उपक्रम दुर्गम भागातील ग्रामविकास, सामाजिक बांधिलकी आणि लोकसहभागाचा प्रेरणादायी संदेश देणारा ठरत आहे…


