ए बी के न्यूज लाईव्ह
सेलु/अभय बेदमोहता
नजिकच्या सुरगाव येथून येळाकेळीकडे कामानिमित्त जात असताना, कोंगा बाभुळगाव येथील अपूर्ण पुलाच्या १५ फूट खोल खड्ड्यात दुचाकीसह कोसळून दोघे जण जखमी झाल्याची थरारक घटना दि.९ आक्टोंबर शुक्रवारचे (रात्री १०:३० वाजताच्या सुमारास) घडली. रुपेश सिंदी मेश्राम वय २६ वर्ष आणि रितीक चेनकार वय २३ वर्ष दोघेही रा.सुरगाव अशी जखमींची नावे आहेत.सुदैवाने लोखंडी सळ्यांवर ते न पडल्याने संभाव्य मोठा अनर्थ टळला आहे मिळालेल्या माहितीनुसार, सुरगाव येथून काही अंतरावर असलेल्या कोंगा बाभुळगाव येथे मागील अनेक दिवसांपासून पुलाच्या बांधकामाचे काम सुरू आहे. मात्र, या ठिकाणी रात्रीच्या वेळी वाहन चालकांसाठी कोणत्याही प्रकारची सुरक्षेची उपाययोजना करण्यात आलेली नाही. शुक्रवारी रात्री १०:३० वाजताच्या सुमारास रुपेश मेश्राम व त्यांचे सहकारी रितीक चेनकर हे मित्र दुचाकीने सुरगाववरून येळाकेळीकडे जात होते. अंधारामुळे रस्ता लक्षात न आल्याने त्यांची दुचाकी थेट पुलाच्या १५ फूट खोल खड्ड्यात कोसळली.या अपघातात रुपेश मेश्राम यांचा चेहरा पूर्णपणे खरचटला असून, रितीक चेनेकार यांच्या खांद्याला (मोंड्याला) दुखापत झाली आहे. तसेच, त्यांची दुचाकीही समोरून पूर्णपणे क्षतिग्रस्त झाली आहे. धोकादायक असलेल्या या खड्ड्यात पडल्यानंतर दुचाकीस्वार अडकले होते. ही बातमी गावात वाऱ्यासारखी पसरताच त्यांचे काही शुभचिंतक आणि ग्रामस्थ तत्काळ घटनास्थळी धावून आले. ग्रामस्थांच्या मदतीने अथक प्रयत्न करून दोघांना रात्रीच खड्ड्याबाहेर काढण्यात आले. व त्यांचेवर रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन घरी आणण्यात आले. दुसऱ्या दिवशी शनिवारी सकाळी ग्रामस्थांच्या मदतीने खड्ड्यात पडलेली दुचाकी बाहेर काढण्यात आली. विशेष म्हणजे, खड्ड्याच्या आजूबाजूला असलेल्या लोखंडी सळाखींच्या कठड्यांवर ते पडले नाहीत, अन्यथा एखादी भीषण दुर्घटना घडली असती, अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे घटनास्थळी कोणत्याही प्रकारची पथदिव्याची व्यवस्था, रेडियम रिफ्लेक्टर किंवा सुरक्षेसाठी कठडा लावण्यात आलेला नाही. कंत्राटदार आणि प्रशासनाच्या या हलगर्जीपणामुळे निष्पाप प्रवाशांचा जीव धोक्यात आला असून, भविष्यात मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी संतप्त मागणी ग्रामस्थांमधून केली जात आहे.


