सेलु/अभय बेदमोहता
क्रीडा संस्कृतीचा अभिमान बाळगणाऱ्या विदर्भाच्या मातीत खेळाडूंना घडविणारी मैदाने कशी उद्ध्वस्त होतात, याचे उत्तम उदाहरण म्हणजे सिंदी रेल्वे येथील अपूर्ण व भकास झालेले क्रीडा संकुल. आठ वर्षांचा काळ लोटूनही ज्या प्रकल्पाचे बांधकाम पूर्ण झालेले नाही हे विशेष .
तेथील मैदानावर आज खेळाडूंचा घाम गाळला जात नसून शेळ्या-मेंढ्या आणि मोकाट जनावरांच्या खूर पडत आहेत.
सन् २०१६ मध्ये तत्कालीन खासदार रामदासजी तडस यांच्या खासदार निधीतून या संकुलासाठी ६ लाख (किंवा प्रशासकीय नियोजनातील अन्य तरतूद) रुपयांची घोषणा झाली, आणि २०१८ मध्ये या कामाचा शुभारंभ झाला. परंतु, या उद्घाटनानंतर प्रशासनाची घडी अशी विस्कटली की, तब्बल आठ वर्षे उलटूनही मैदानाला एक अदलाबदल करणारी साधी संरक्षण भिंतही लाभलेली नाही. परिणामी, हे मैदान क्रीडाप्रेमींसाठी नसून परिसरातील जनावरांसाठी हक्काचे कुरण बनले आहे.
या संपूर्ण प्रकल्पातील प्रशासकीय सुबुद्धतेची परिसीमा म्हणजे, दोन स्वतंत्र प्रवेशद्वारांपैकी एका प्रवेशद्वाराच्या अगदी मध्यभागी उभारण्यात आलेले मुत्रीघर! हे एकच उदाहरण स्थानिक नगरपालिकेच्या आणि यंत्रणेच्या भोंगळ कारभाराची पोलखोल करण्यासाठी पुरेसे आहे. खेळाडूंसाठी येथे पिण्याच्या पाण्याची सोय नाही, महिला व पुरुष खेळाडूंसाठी स्वतंत्र चेंजिंग रूम किंवा स्वच्छतागृहांचा मागमूस नाही. एका कोपऱ्यात बसविण्यात आलेला हायमॅक्स दिवा हा कायमचा बंद असल्यामुळे रात्रीच्या वेळी हा संपूर्ण परिसर असामाजिक घटकांचा अड्डा बनतो. दिवसा शेळ्या-मेंढ्यांची शाळा भरणारे हे मैदान रात्री दारुड्यांच्या मैफिली सजण्याचे केंद्र ठरत आहे.
कबड्डीसारख्या मातीतील खेळाचे हे शहर ‘माहेरघर’ म्हणून ओळखले जात असून या तालुक्यातील अनेक खेळाडू राष्ट्रीय स्तरावर आपले खेळ प्रदर्शनाने तालुक्याच्या शिरपेचात नाव कमवीत आहे.तर सिंदी रेल्वे याच शहरात स्थानिक खेळाडूंनी वारंवार नगरपालिकेचे अधिकारी, स्थानिक आमदार, खासदार आणि केवळ निवडणुकीपुरते थापा देवून आश्वासने देणाऱ्या नगरसेवकांकडे धाव घेतली. मात्र, कागदी घोडे नाचविण्याशिवाय हाती काहीच आले नाही. लाखो रुपयांचा जनतेचा पैसा खर्च करून जर खेळाडूंऐवजी जनावरांनाच आश्रय मिळणार असेल, तर या विकासाचा नेमका फायदा कोणाचा?
सहा कोटींच्या आसपास निधी मुरपूनही जर मैदानाची हीच गत राहत असेल, तर तो केवळ प्रशासनाचा नसून स्थानिक लोकप्रतिनिधींच्या अनास्थेचा पराकोटीचा नमुना आहे. कागदोपत्री विकास दाखवून जनतेच्या डोळ्यात फेकली जाणारी धूळ आता थांबायला हवी. या बकाल आणि बधीर झालेल्या व्यवस्थेविरोधात जागी झालेली जनता आगामी काळात अशा पदाधिकाऱ्यांना मतपेटीतून काय उत्तर देते, हेच आता पाहणे औत्सुक्याचे ठरेल.


