ऐ बी के न्यूज लाईव्ह सेलु,अभय बेदमोहता
सेलू आणि कारंजा तालुक्याला जोडणाऱ्या हिंगणी येथील बोर नदीवरील पुलाची अत्यंत दुरवस्था झाली असून, पुलावर ठिकठिकाणी पडलेले जीवघेणे खड्डे आणि पावसाने पसरलेला चिक्कन मातीचा थर यामुळे वाहनचालकांना मोठा धोका निर्माण झाला आहे.
सात दशकांपूर्वी बांधलेला हा पूल या परिसरासाठी अत्यंत महत्त्वाचा वाहतूक मार्ग आहे.
सदर पूल हा सेलू तालुक्यातील हिंगणी या मुख्य बाजारपेठेच्या गावाला कारंजा तालुका आणि माळेगावशी जोडतो.
नानबर्डी, डोंगरगाव, वाडी, खैरी मेनखात मार्गे सेलू, तसेच झडसी, क्षीरसमुद्रपूर, अंतरगाव मार्गे आंजी, धामणगाव, सालई, सोंडी, आमगाव, माळेगाव ठेका आणि कारंजा (घाडगे)कडे जाणारी वाहतूक याच पुलावरून चालते.
या मार्गावरून दररोज शेकडो नागरिक, शालेय विद्यार्थी आणि वाहनांची मोठी वर्दळ असते.
पुलावरील खड्डे अतिशय खोलगट आणि धोकादायक बनल्याने व डागडूजी कडे संबंधितांचे होणारे दुर्लक्षामुळे वाहनचालकांना कसरत करावी लागते.
रात्रीच्या वेळी या परिसरात विजेची व्यवस्था नसल्याने अंधारात हे खड्डे लक्षात येत नसल्यामुळे येथे किरकोळ अपघात दररोजचे ठरलेले असून भविष्यात कधीही मोठा अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात असून जिवीत हानी होण्याची शक्यता नाकारली जावू शकत नाही.
नुकत्याच झालेल्या तुरळक पावसामुळे पुलावर चिखलाचा (चिक्कन मातीचा) थर साचल्याने दुचाकी घसरण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.
जवळपास ७ दशक जुन्या या पुलाची संबंधित प्रशासनाने तातडीने पाहणी करावी, नवीन नाही तर कमीतकमी पडलेले खोलगट खड्डे बुजवून योग्य ती दुरुस्ती करावी, अशी आग्रही मागणी परिसरातील ग्रामस्थांकडून होत आहे. एखादी मोठी जीवितहानी घडण्यापूर्वी प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ उपाययोजना करावी, अशी तीव्र अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.


