अंकिसा प्रतिनिधी : देवेंद्र कुमार रंगुवार
अंकिसा –
सिरोंचा तालुक्यातील आसरअल्ली वनपरिक्षेत्रातील सर्कल क्रमांक ४९३, ५८० व ३१६, गाव-गोलागुडम मालमधील वनजमिनींसंदर्भात अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी (वनहक्कांची मान्यता) कायदा, २००६ अंतर्गत प्रलंबित दावे व अर्जांची पडताळणी प्रक्रिया सुरू आहे. मात्र या प्रक्रियेबाबत काही नागरिक व ग्रामीण भागात गैरसमज निर्माण झाल्याचे वनविभागाच्या निदर्शनास आले आहे.वनविभागाने स्पष्ट केले आहे की, कोणत्याही प्रकारच्या नवीन वनजमिनीचे वाटप अथवा नवीन पट्टे देण्याची प्रक्रिया सुरू नाही. सध्या सुरू असलेली प्रक्रिया ही केवळ १३ डिसेंबर २००५ पूर्वीपासून पात्र आदिवासी व इतर पारंपरिक वननिवासी बांधवांच्या वनजमिनीवरील अतिक्रमणासंदर्भातील कायदेशीर दाव्यांची छाननी व पडताळणी करण्यापुरती मर्यादित आहे.या दाव्यांची पडताळणी अध्यक्ष, उपविभागीयस्तरीय वनहक्क समिती तसेच उपविभागीय अधिकारी यांच्या आदेशानुसार करण्यात येत आहे. पडताळणी प्रक्रियेत अतिक्रमण धारकांचा मोका पंचनामा, नमुना-अ, जी.पी.एस. नकाशा आदी माहिती संबंधित समिती व अधिकाऱ्यांकडे सादर केली जाणार आहे.१३ डिसेंबर २००५ नंतर झालेले नवीन अतिक्रमण वनहक्क कायदा २००६ नुसार बेकायदेशीर मानले जाते. अशा अतिक्रमणाला अथवा दाव्याला वनहक्क कायद्यांतर्गत मान्यता देता येत नाही. वनहक्क कायद्यानुसार दाव्यांवर अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार जिल्हास्तरीय समितीला असून, वनविभागाकडून केवळ तांत्रिक तपासणी व मोजणीसाठी सहकार्य केले जाते.वनविभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, “वनजमिनीचे वाटप सुरू आहे” अशा अफवांवर विश्वास ठेवू नये. काही असामाजिक किंवा मध्यस्थ व्यक्तींकडून जमिनीचे पट्टे मिळवून देण्याचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीला पैसे देऊ नयेत. वनजमीन मिळविण्याच्या आशेने जंगलातील झाडे तोडणे, साफसफाई करणे अथवा बेकायदेशीरपणे ताबा मिळविण्याचा प्रयत्न करणे हा गंभीर प्रकार असून, अशा प्रकरणात भारतीय वन अधिनियम, १९२७ अंतर्गत कारवाई होऊ शकते.नागरिक व ग्रामस्थांनी वनविभागाला सहकार्य करावे तसेच वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी केवळ अधिकृत शासकीय प्रसिद्धीपत्रकांवर विश्वास ठेवावा, असे आवाहन आसरअल्ली वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. एस. पी. पानगे यांनी केले आहे.


