आलापल्लीतील शिक्षक डॉ. सखाराम झोडे यांना राज्यस्तरीय कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कार
आलापल्ली:-
( गडचिरोली) : अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी सातत्याने उपक्रम राबविणारे शिक्षक डॉ. एस. ए. झोडे यांना राज्यस्तरीय कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कार-२०२६ देऊन गौरविण्यात आले.विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन, विद्यार्थ्यांप्रती असलेली बांधिलकी आणि नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमांमुळे डॉ. झोडे यांनी शिक्षण क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली आहे. विविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विज्ञान विषयाची गोडी निर्माण करण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत.या शैक्षणिक सत्रात त्यांनी ‘साधे प्रयोग करून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे’ हा नाविन्यपूर्ण उपक्रम सादर केला. टाकाऊ साहित्याचा वापर करून विद्यार्थ्यांना विविध वैज्ञानिक प्रयोग प्रत्यक्ष व सोप्या पद्धतीने समजावून देण्याचे काम या उपक्रमातून करण्यात आले.या उल्लेखनीय कार्याची दखल घेत ‘शिक्षक ध्येय’ या शैक्षणिक संस्थेच्या वतीने डॉ. झोडे यांना राज्यस्तरीय कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कार-२०२६ प्रदान करण्यात आला. आलापल्ली येथे आयोजित मेगा इव्हेंटमध्ये शेकडो मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार सोहळा पार पडला.RCM चे स्टार सफायर कोअर लिडर प्रा. श्री. एस. अत्री यांच्या हस्ते डॉ. झोडे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी स्टार एमरॉल्ड मनोद्र बाला सर, स्टार पर्ल प्रकाश तलांडे सर, स्टार पर्ल बाटवे साहेब यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.डॉ. झोडे यांच्या शैक्षणिक कार्याची दखल घेत त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल शिक्षण क्षेत्रातून तसेच विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.


