अंकिसा प्रतिनिधी/ वेंकस्वामी चकिनला
सिरोंचा तालुक्यातील चिंतारेवला ग्रामपंचायत अंतर्गत झोडापल्ली ते पाणीचे टाकी पर्यंत मार्गाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. या मार्गावरील काँक्रेट रस्ता पूर्णपणे उखडला असून अनेक ठिकाणी गिट्टी बाहेर आली आहे. त्यामुळे वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असून शाळकरी विद्यार्थ्यांनाही या रस्त्यावरून ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे.तसेच जोडापेल्ली परिसरातील पाणी टाकीजवळ पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचून राहत आहे. रस्त्यावर गुडघाभर पाणी साचल्याने जोड्यागुडम गावात जाण्यासाठी रस्ताच बंद झाल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. नागरिकांना या पाण्यातूनच मार्ग काढत गावात जावे लागत आहे.पाणी टाकीजवळ साचलेले पाणी रस्त्यावरून वाहून जाण्याऐवजी परिसरातच साचून राहत असल्याने नागरिकांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. त्यामुळे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन रस्त्याची पाहणी करावी, साचलेल्या पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था करावी तसेच रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.



