वर्धा/अभय बेदमोहता
जात वैधता व कागदपत्रांच्या अडीअडचणी दूर करण्याची मागणी…!
बेलदार (ओड) भटका समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि ऐतिहासिक विकासासाठी प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांचे निवेदन मृद व जलसंधारण मंत्री मा. श्री. संजय राठोड यांच्या उपस्थितीत आयोजित DNT प्रवर्गाच्या संयुक्त सहविचार सभेत सादर करण्यात आले. बेलदार समाज, महाराष्ट्र राज्याच्या वतीने हे निवेदन देण्यात आले असून, समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाने तातडीने कालबद्ध निर्णय घ्यावा, अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे.समाजातील बहुतांश कुटुंबे आजही आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागासलेली आहेत. विशेषतः जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र आणि नॉन-क्रीमी लेयर मिळवण्यात येणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि करिअर धोक्यात आले आहे. जुन्या कागदपत्रांच्या अभावामुळे पात्र विद्यार्थ्यांना शासकीय योजना, शिष्यवृत्ती आणि आरक्षणाचा लाभ मिळण्यात मोठ्या अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. जात प्रमाणपत्र व वैधता मिळवण्यासाठी तालुका आणि जिल्हास्तरावर विशेष शिबिरे आयोजित करावीत.सन १९६१ पूर्वीचे पुरावे नसलेल्या कुटुंबांसाठी उपलब्ध महसुली नोंदी व शाळा दाखल्यांच्या आधारे सकारात्मक निर्णय घ्यावा. प्रत्येक जिल्ह्यात विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी विशेष सहाय्यता व मार्गदर्शन केंद्र सुरू करावीत. गायरान किंवा शासकीय जागेवर वास्तव्यास असलेल्यांना घरपट्टे व घरकुलाचा लाभ द्यावा. बेरोजगार युवकांसाठी विशेष व्यवसाय प्रशिक्षण आणि आर्थिक सहाय्य योजना राबवाव्यात.बेलदार समाजाच्या गौरवशाली इतिहासाचा आणि योगदानाबाबत दस्तऐवजांचा शासकीय स्तरावर अभ्यास करून अधिकृत नोंद घ्यावी.या वेळी वर्धा जिल्ह्याचे समाज अध्यक्ष अनिल ह. चव्हाण यांनी समाजाच्या प्रश्नांची सविस्तर मांडणी केली. शासनाने या संवेदनशील प्रश्नांवर सहानुभूतीपूर्वक विचार करून तातडीने संयुक्त बैठक लावावी आणि कालबद्ध कृती आराखडा तयार करावा, अशी आर्त हाक समाजाच्या वतीने देण्यात आली आहे.


